रंग मनाचे

' नावात काय आहे?' - हा प्रश्न तसा जगजाहीर.नावात खरचं तसं काही नाही.ते नाव घेवुन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला ह्याला जास्त महत्व. तुम्हांला कोणते आईवडील लाभले त्यावर बरचसं अवलंबुन.तुमचा बँकबँलन्स पण नजरेआड करता येणार नाही.
पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजुतल्या एका ताटलीतल्या.दुसरी ताटली तुमची स्व:तची.ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबुन.

'इट जस्ट हँपन्स' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात , ती जास्त जगतात.अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल.काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं.
पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य?
'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे.'
अकरा शब्दांत समर्थांनी सगळं आयुष्य उकलुन दाखवलं.

कोणत्याही व्यक्तिच्या मृत्यूबद्दल, त्याची हळहळ संपली की स्मारकं संपली.
राहतात त्या तसबिरी.

दुर्गुणांना अनेक रुपं धारण करता येतात.आणी इतकी ती आकर्षक असतात.

माणसाच्या मनाचे व्यापार सहजासहजी कसे समजणार?ज्याचा तोही सांगु शक्त नाही, मग इतरांनी शिक्के मारायची घाई का करावी?

नियतीचं माणसाला काही सुखांना पारखं करते,तेव्हा तिथे इलाजच नसतो.पण, त्याहीपेक्षा, माणुस जेव्हा दुसर्‍या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त.

सुविचारांची वही ही नंतर शोभेची वस्तु होते..

ऐश्वर्य आणी सौंदर्य यांना मदत करायला सगळेच झटत असतात.

समाजातला वावर सांभाळुन केला पाहीजे. सौंदर्याने आपलं अस्तित्व स्वत:पुरतचं ठेवायला हवं.
शिंपलीतला मोती, शिंपली उघडली तरच दिसतो. तसचं सौंदर्य निराकाराच्या अवगुंठनात नांदाव.

आपल्याला मुद्देसुद बोलता येत नाही, स्वत:चं म्हणणं ठासून मांडता येत नाही, समोरच्या कोणत्याही माणसासमोर नमतं घ्यावं लागतं ह्याची काहींना जाणीव असते. आणी त्यांची त्यांना चीडही येते. म्हणूनच कोणत्याही चर्चेच्या बाबतीत अशा माणसांना प्रारंभ जमतो. एक-दोन विधानं ती माणसं सुसंगतपणे करतात. त्यांच्या विधानांना तोडीस तोड तर्कशुध्द उत्तरं मिळू लागली की मग फ़ार काळ त्यांना टिकाव धरता येत नाही. मग त्यांचा तोल जातो. तोल गेला की आरोप असंबध्द व्हायला लागतात. चर्चेचा शेवट निव्वळ त्राग्यात होतो.

तंत्रावर फ़क्त यंत्रच जिंकता येतात. मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.

चप्पल काय आणी संसार काय. तो कुणाच्या हातात पडतो यावर अवलंबून.

बाणेदार माणसालाच बाणॆदारपणाची किंमत किती मोजावी लागते ते समजतं. अशा वेळी डोळ्यांतून येऊ पाहणार्‍या पाण्याला सांत्वन नको असतं. स्वतचा पराभव जेव्हा स्वत:जवळही मान्य करावासा वाटत नाही, तेव्हा डोळ्यांतून येणारं पाणी पापणीच्या काठावरुन आत जिरवायचं असतं.

चांगलं आणी वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणी अस्तित्व असतं का?
'हो' आणी 'नाही'ही.
'तुलना' नावाची राक्षसीण जोपर्यंत मध्ये उभी राहत नाही, तोपर्यंत ह्या शब्दांचा विहार चालतो. तिने हस्तक्षेप केला की संपलं! ही राक्षसीण येताना एकटी येत नाही, तिच्याबरोबर तिची बहीण येते. ती तुम्हांला बहीणीच्या स्वाधीन करते आणी दुसर्‍या मनाचा बळी घेण्यासाठी ती निघुन जाते.
ह्या बहीणीचे नाव 'तडजोड'. ही तुम्हांला आयुष्यभर साथ देते.

आर्थिक झळ किंवा तूट भरुन काढता येते. शारीरिक हानी भरुन काढताना जरा क्लेश होतात आणी त्याची शाश्वती नाही. पण गेलेली वेळ मात्र कधिच परत येत नाही.

परमेश्वराने माणसाला दोन गोष्टी बहाल केल्या . दोन हात आणी एक मन. माणसाने बेदम कष्ट करावेत आणी उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गँरंटी मागत नाहीत. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालविली म्हणुन आता नियतीसुध्दा कसलीच गँरंटी देत नाही. संतांच उदंड प्रेम परमेश्वरावर असतं. म्हणुन संत कसलीच हमी मागत नाहीत. ते निर्भय असतात.

जिथे उमटलेला ठसा जतन केला जाईल, तिथेच शिक्का उमटावा.
नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात.

दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते, त्या वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करुन ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेऊन ते खाली उतरवावं.

चार गोड शब्द बोलणं म्हणजे इवल्याशा खारीच्या पाठीवर रामाची बोटं उमटवणं.

नवरा आणी नियती यात फ़रक काय?
सगळ्या स्त्रियांमागे हात धुऊन लागायला नियतीला वेळ पुरत नसावा, म्हणुनच तिने नवरा नावाचा प्राणी निर्माण केला. तिच्याइतकाच लहरी.

मुर्ख प्रश्नांना तशीच उत्तरं सतत शोधण्याचा आणी त्याची पुर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो. त्यात आपण चांगलं काम करण्याची शक्ती गमावून बसतो.

वैकुंठ, शिक्षण, पदव्या ह्या गोष्टी चिलखतासारख्या वागवायच्या .व्यावहारीक युध्द जिंकण्यासाठी.
संसारात मन आणी माणुसकी हेच महत्वाचं. तिथं ही मोठेपणाची चिलखतं कशासाठी? संसाराची व्यवहारिक बाजू डिग्रीवरच चालते.

संसार ही एक जबाबदारी असते. त्याचं ओझं व्हायला लागलं की गंमत गेली.

प्रेम, मैत्री, संगोपन, शुश्रूषा ह्या सगळया जबाबदार्‍या त्याचं ओझं वाटलं की सहजता गेली.

" ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"
"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्विकारलेली असते.
ओझं हीच जर जबाबदारी असती तर तुमच्या पाचशे रुपयांच्या बँग्ज विमानातल्या कर्मचार्‍यांनी फ़ेकुन तोडल्या असत्या का? "


संघर्ष न वाढवता नांदावं कसं हे सहज जमतं. त्यासाठी खुप अक्कल लागते, असं नाही.
लागतो तो पेशन्स आणि संघर्षाशिवाय जगावं ही तळमळ.

मन:स्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात.त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात फ़ुलं ठेवता येतात.

1 comment: